भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.
संस्कृत भाषा आणि शिक्षणाच्या सर्वांगीण संवर्धन आणि विकासासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय संस्कृत विद्यापीठामार्फत बहुविध केंद्रीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या एकूण ११ विद्यार्थिनींना प्रत्येकी रु. ५००० एवढी गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संगणक विभाग प्रमुख प्रा. गिरीश सोनार यांनी सांगितले की संस्कृतला ज्ञान प्रणाली म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये गणित, तत्त्वज्ञान, व्याकरण, संगीत, राजकारण, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र, धातूशास्त्र, नाटक, कविता, कथाकथन यांचा मोठा खजिना आहे. म्हणून संशोधनाच्या माध्यमातून संस्कृत शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी संस्कृत शिक्षिका निशाली शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.