विद्यार्थ्‍यां दशेतच उद्योजक घडाव…

विद्यार्थ्‍यां दशेतच उद्योजक घडावा, वेगवेगळ्या व्‍यवसायाचा अनुभव त्‍यांना महाविद्यालय जीवनातच मिळावा या उद्देशाने शिक्षणातून विकासाकडे ही संकल्‍पना घेवून ‘बिल्‍डींग प्रवरा’ या विद्यार्थ्‍यांचा समावेश असलेल्‍या भव्‍य एक्‍स्‍पोचे आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या पुढाकाराने करण्‍यात येणार आहे.

विद्यार्थ्‍यांच्‍या सहभागाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या एक्‍स्‍पोमध्‍ये फनी गेम, खाद्य प‍दार्थांचे स्‍टॉल तसेच येणा-या दिवाळी निमित्‍ता लागणा-या सर्व साहित्‍यांचे १५० स्‍टॉल विद्यार्थी उभे करणार आहेत. दिनांक १८ ते २० ऑक्‍टोंबर २०२४ या तिन दिवसांच्‍या कालावधीत लोणी बुद्रूक येथील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील क्रिडा संकुलाच्‍या मैदानावर या विद्यार्थ्‍यांच्‍या बिझनेस एक्‍स्पोचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या एक्‍स्पोमध्‍ये विद्यार्थ्‍यां बरोबरच शिक्षक आणि पालकांचाही सहभाग असणार असून, विद्यार्थी दशेतच उद्योजक घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने एक छोटासा अनुभव या एक्‍स्‍पोमधून मिळावा हा विचार आहे. यापुर्वी गणेश उत्‍सव तसेच नवरात्र उत्‍सवात ‘सहकारातून समृध्‍दीकडे’ या संकल्‍पनेतून या उत्‍सवात विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यशस्‍वीपणे राहीला. आता ‘शिक्षणातुन विकासाकडे’ ही संकल्‍पना घेवून बिल्‍डींग प्रवरा हा उपक्रम विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

यापुर्वी ग्रामीण भागात शिकलेला विद्यार्थी हा शेती व्‍यवसायाकडेच वळत असे. परंतू आता शिक्षणाच्‍या वाटाही विस्‍तृत झाल्‍या असल्‍याने मिळालेल्‍या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्‍यांना व्‍यवसाय आणि उद्योगासाठी कसा करता येईल, व्‍यवसायामध्‍ये लागणा-या आवश्‍यक सुविधा मार्केटींगचे ज्ञान, माल भरण्‍याची प्रक्रीया याचा अनुभव या एक्‍स्‍पोमधून विद्यार्थ्‍यांना मिळावा हा उद्देश बिझनेस एक्‍स्‍पोच्‍या माध्‍यमातून आहे. या वर्षापासून हा बिझनेस एक्‍स्पो सुरु केला असून, भविष्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी याचे आयोजन करण्यात येणार आहे