उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता. खेड्यातील मुलां-मुलींमध्ये प्रवेश परीक्षेबाबत असलेला न्युनगंड घालवून त्यांच्या करियरच्या स्वप्नपुर्तीसाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा यासाठी या मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता स्पर्धा परिक्षा साठी मार्गदर्शनाचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या मुंबई येथील अवंती या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून आधुनिक शिक्षण पद्धतीच्या गुरुकुल निर्मिती कडे वाटचाल केली असल्याचे संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व त्याचबरोबर बारावीनंतरच्या जेईई व तत्सम प्रवेश स्पर्धा परिक्षेत उत्तम यश प्राप्त होण्यासाठी मुंबई येथील अवंती या संस्थेशी नुकताच करार करण्यात आला. यावेळी प्रवरा एवीएशन संस्थेच्या संचालिका सुस्मिता माने-देशमुख, अवंती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा रामकुमार, संस्थेचे शिक्षण व अस्थापणा संचालक प्रा.दिगंबर खर्डे उपस्थित होते.
डॉ. यशवंत थोरात म्हणाले की, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना जेईई अथवा तत्सम प्रवेश परिक्षा स्पर्धेबाबत मोठी अडचण भासते. पालकांनाही याबाबत अतिशय कमी प्रमाणात माहीती असते. त्यामुळे होतकरू व पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या चांगल्या करियरच्या संधी हुकल्या जातात. यावर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता नवे पाऊल उचलले असून त्यादृष्टीने मुलांचे नुकसान होऊ नये व त्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आवड निर्माण व्हावी व उत्तम यश प्राप्त करून योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
संस्थेतील ईयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत शिक्षकांमार्फत विशेष प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी प्रवेरतील शिक्षकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन दिल्यावर अकरावी व बारावीत त्यांना जेईई व इतर प्रवेश स्पर्धा परिक्षेबाबत आणखी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी क्रमिक पुस्तके, डीजीटल अँप व विशिष्ठ अभ्यासक्रम यांचा वापर होईल. त्यामुळे विद्यार्थी चागल्या प्रकारे तयार होतील व परिक्षेत उत्तम यश प्राप्त करतीलच परंतू त्यांना करियरची योग्य दिशा व उच्च शिक्षणासाठी आयआयटी सारखी योग्य संस्था निवडणे सोपे होईल याची खात्री असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
सध्या बारावीत विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी संस्थेने “२०२० प्रवरा टू आयआयटी” हा उपक्रम हाती घेतला असून तिनशे विद्यार्थ्यांनी निवड करून जेईई प्रवेश परिक्षेची ऑनलाईन सराव परिक्षा घेण्यात अली. यातून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एक महिन्याचे अवंती या संस्थेमार्फत विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. अवंती या संस्थेच्या मार्गदर्शनातून आयआयटी मध्ये प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने हा शैक्षणिक करार केला असल्याचे डॉ. यशवतं थोरात यांनी शेवटी सांगतिले.