कृषी शिक्षण घेत असतांना कृषी पदवीधर हे कृषी संबंधित आधुनिक ज्ञान प्राप्त करत असतात. हे ज्ञान भविष्यात त्यांनी शेतकरी हितासाठी वापरावे व त्यामधून शेतकऱ्यांना मदत व्हावी असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि संलग्नीत महाविद्यालयाच्या कृषितरंग २०२४ निमित्त आयोजित सांस्कृतिक आणि वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात सौ.शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषिभूषण ग्रोव्हर कंपनी, नाशिक चे चेअरमन भूषण निकम , गेन अकॅडमीचे संतोष वाघमारे,संस्थेचे संचालक श्री.शिवाजीराव जोंधळे,सहसचिव भारत घोगरे, डॉ.उत्तमराव कदम, कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल बेंद्रे,माजी विद्यार्थी भाऊसाहेब पवार, तुषार गोंदकर, प्रगती इंगळे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात श्री.भूषण निकम यांनी कृषि पदवीधरांना सध्या कृषी आधारितअनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या अनेक योजना त्याला पाठबळ देत आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन केले तसेच श्री.शिवाजीराव जोंधळे यांनी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील बदलांचा स्वीकार करून त्यात कारकीर्द करावी असे मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांनी प्रास्ताविकांत कृषि संलग्नित महाविद्यालयांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल पाटील, कृषी महाविद्यालयाचा ऋतिका अनाप तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा अहवाल धिरज कळमकर यांनी सादर केला. यावेळी क्रिडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय सादरीकरण केलेल्या कृषी महाविद्यालय,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले तर कृषी महाविद्यालयास उपविजेते पद प्राप्त झाले.