कृषी पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी हितासाठी करावा – सौ.शालिनीताई विखे पाटील

कृषि क्षेञात मोठी संधी आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रवरेच्या माध्यमातून कृषी शिक्षण देत असताना सेंद्रिय शेती वरती भर दिला आहे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देत त्यांना प्रत्यक्ष कामाचाही अनुभव या ठिकाणी मिळत असल्यामुळे येथील विद्यार्थी आज सर्व गुण संपन्न ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि शास्त्र संस्थेच्या जल्लोष २०२४ निमित्त आयोजित पालक मेळावा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात सौ.शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, संचालक भाऊसाहेब ज-हाड, सहसचिव भारत घोगरे, प्रवरा कृषि शास्ञ संस्थेचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम,ह.भ.प. चंद्रकांत महाराज सावंत,पञकार दिलीप खरात,उदय धामणे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप महाले,कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा.भाऊसाहेब घोरपडे,कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयांचे प्राचार्य डाॅ.आशिष शिरसागर,अन्न तंञज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.चंद्रकला सोनवणे विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी सातपुते, यशवंत पेरे, आदिती कोरडे, समृद्धी गुजर, माजी विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ विखे पाटील म्हणाल्या, आज कृषी शिक्षणामध्ये मुलींचाही सहभाग मोठा आहे. त्याच दृष्टीने शेतकरी नवरा हवा ग बाई हा दृष्टिकोन मुलींनी यापुढे जपावा. शेती क्षेत्रत चांगले करिअर करुन या माध्यमातून उद्योग आणि उद्योजकता वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना आज विविध तंत्रज्ञानाची गरज आहे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी सोबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची ही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. प्रवरेच्या माध्यमातून चालक, पालक, बालक,शिक्षक आणि विद्यार्थी असे एकञित शिक्षण देत असल्यामुळे संस्था ही प्रगतीपथावर राहिली आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा भक्कम करण्याचं काम कृषीच्या विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांनी कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी आणि सक्षम युवा शेतकरी घडवण्याचं काम करत असताना येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिले जाते. यामुळे प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच शेतीचे तंत्रज्ञानही येथील विद्यार्थ्यांना अवगत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवरा कृषि शास्त्र संस्थेचे संचालक प्रा.डाॅ. उत्तमराव कदम यांनी प्रास्ताविकांत कृषि शास्त्र संस्थेने मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत प्रवरेत कृषी शिक्षण घेत असलेला आपला मुलगा हा आमचा पाल्य आहे. त्यामुळे तो आदर्श घडवणे हाच आमचा ध्यास असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे विद्यार्थीनी वाचन केले.

प्रारंभी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या वतीने पालकांसाठी विद्यार्थ्यांनी फुलवलेली प्रात्यक्षिकाची प्रक्षेत्राची शिवार फेरी, पालक संवाद बैठक पालकांना महाविद्यालयाच्या विविध सेवा सुविधांची माहिती देण्यात आली . विद्यार्थ्यांनी यावेळी विक्रीसाठी ठेवलेल्या स्ट्रॉबेरी, टरबूज,खरबूज आणि परदेशी भाजीपाल्याला देखील मोठी पसंती पालकांकडून देण्यात आली. यावेळी द्वीमासिक वार्तापत्राचे प्रकाशन त्याचबरोबर लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विश्व विक्रम झालेल्या गणेश मिरवणुकीत विश्वविक्रमाचे प्रमाणपत्राचे ही वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी क्रिडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय सादरीकरण केलेल्या कृषी महाविद्यालय,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,अन्नतंञज्ञान महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या यशस्वी
विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.