पदमश्री उपाधीचा बहुमान हा काळ्या आईला देऊन अधिक उत्पादनाच्या मोहापायी औषधे आणि रासायनिक खतांच्या अतिवापराने जमीनीचे बिघडलेले अयोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले तर, भविष्यात सर्वांना चांगले अन्न मिळून देश विषमुक्त होईल असा विश्वास बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केला.
लोणी खुर्द येथे कै. गं.भा. मंजुळाबाई वसंतराव घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त अविष्कार बायोफार्म प्रा.लि च्या वतीने बिजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. कै. मंजुळाबाई घोगरे या पदमश्री विखे पाटील यांच्या कन्या आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या भगिनी होत्या. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाऊसाहेब विठ्ठलराव विखे पाटील,रामराव भदगले, कैलास तांबे, प्रतापराव तांबे, शांतीनाथ आहेर,डॉ.वसंराव कवडे, श्रीमती मनकर्णाबाई कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी आपले मनोगत व्यक्त करताना श्री भारत घोगरे म्हणाले की, आमच्या मातोश्री कै.गं.भा. मंजुळाबाई वसंतराव घोगरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत कौटुंबिक जबाबदारी पार पडताना, वनौषधी बाबत सखोल ज्ञान आणि बियाणे संवर्धनाचा त्यांचा छंद होता. अविष्कार बायोफार्म चे बीज हे आमच्या मातोश्रीच्या अचेतन मनातले स्पष्ट न झालेले वास्तव असावे असे सांगताना पैस्याचे योग्य नियोजन करून कष्ठ करण्याची शिकवण आमच्या जीवनात उपयोगी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी यावेळी श्री मछिंद्र घोगरे, सौ. ज्योती घोगरे, अविष्कार घोगरे,अभिजित घोगरे, प्रसाद घोगरे,यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते कै. घोगरे यांच्या समाधी स्थळावर तयार करण्यात आलेल्या बागे मध्ये दिवंगत नातलगांच्या नावाने औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांचे रोपंण करण्यात आले.
पदमश्री राहीबाई म्हणाल्या की, ‘मला मिळालेली पद्मश्री उपाधी ही मी आतापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा गौरव असून, बायफ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहोचवता आले. असे सांगताना “टाकी चे घाव सोसल्या शिवाय, दगडाला देवपण येत नाही”,या शिकवणीतूनच मातीशी नाते जोडताना, घरातील विरोध पत्करून गेली बावीस वर्ष सेंद्रिय शेती आणि गावरान बियाणांच्या संवर्धनातून विषमुक्त अन्नधान्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करता आले असे सांगताना, कै. गं.भा. मंजुळाबाई घोगरे या मातेचे प्रयत्नही त्याच दिशेने होतेअसे सांगून,काळ्या आई बरोबरच आपल्या मातापित्यांची सेवा करण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला…
सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, जुन्या पिढीतील माणसांकडून घेण्यासारखे खूप ज्ञान असते परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जुन्या -नव्या विचारामध्ये फरक पडत असल्याने हा ज्ञानाचा ठेवा आटत चालायचे सांगून,गं.भा. मंजुळाबाई घोगरे यांनी प्राप्त परिस्थिती मध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना,संस्काराचे रोपण, आपल्या मुलांवर केल्या मुळेच आज स्व;कष्टला हे कुटुंब महत्व देत असल्याचे त्या म्हणाल्या.
मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आदिवासी भागातील निरक्षर असलेल्या राहीबाई यांच्या कार्याची दखल घेऊन पायरेन्स या संस्थेने प्रथम त्यांना सन्मानित केले होते,आता पदमश्री मुळे त्यांचे कार्य अधिक लोकांसमोर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिनेश भाने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अविष्कार घोगरे यांनी आभार व्यक्त केले.