शेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि पिक व्यवस्थापन यांची माहीती शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने प्रवरेच्या कृषि संलग्नित महाविद्यालयामार्फत शिर्डी मतदार संघात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादातून थेट बांधावर जावून कृषी विस्ताराचा सुरू केलेला जागर कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांना मार्गदर्शक ठरत आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत जैव तंञज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, कृषि महाविद्यालय , डेअरी सायन्स आदीचे शिक्षण दिले जाते. कृषि शिक्षासोबतचं विद्यार्थी, शेतकरी आणि कृषिपुरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, पिक व्यवस्थापन, लागवड तंत्र, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष बांधावर जावून परिसंवाद, शिवारफेरी, चर्चासत्रातून माहीती देण्याचा अनोखा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रम नियोजन, प्रत्यक्ष बांधावर शिक्षण तर शेतक-यांना थेट बांधावर माहीती आणि विविध योजनेद्वारे शेतीमध्ये नाविन्य पुर्ण माहीती मिळत आहे. यासाठी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक लिलावती सरोदे ,प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहीत उबरकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि शेती क्षेञासाठी महत्वपूर्ण ठरत आहे.