गणित-विज्ञान हा विषय जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. हा विषय मुलांच्या कल्पना शक्तीला संधी देणारा आहे. प्रदर्शनामुळे मुलांना हा विषय सोपा होत असून यामुळे विषयाची आवड मुलामध्ये निर्माण होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत विज्ञान, गणित आणि कलाप्रदर्शन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालय येथे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या प्रवरेतील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी होणारे हे प्रदर्शन माहीती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोगांची माहीती मिळते. हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. म्हणूनच शालेय जीवनातून या प्रदर्शनाची गरज आहे. शेतक-याची मुले आज उच्च शिक्षणातून पुढे जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेत असतांना विविध उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविल्याने आज नगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आघाडीवर असल्याचे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी स्पर्धेच्या युगात प्रवरेचे शैक्षणिक उपक्रम हे विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण ठरत असून यामुळे त्याच्या कला गुणाला मोठी संधी मिळते.
प्रास्ताविकामध्ये संजय देशमुख यांनी प्रदर्शनाचा आढावा घेत यामध्ये प्रवरेच्या १०० शाळामधुन १६२ उपकरणे सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इलग यांनी तर आभार सुभाष कडू यांनी मानले.