आजच्या संघर्षमय जीवनात, यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, भौतिक गोष्टींची प्रलोभने यामुळे धकाधकीच्या आणि असुरक्षित दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या चिंता आणि संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितिन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेले लोणी येथील श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्र यांच्या आयोजनाने राष्ट्रीय युवादिनानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय युवा प्रबोधन व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसंगी सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संस्थेच्या कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ.शालिनीताई विखे पाटील म्हणाल्याकी, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर अध्यात्म पण तितकाच महत्वाचा आहे जेव्हा आद्यत्म आणि विज्ञान यांची सांगड होते तेव्हा यश नक्कीच मिळेल आणि उच्चपदापर्यंत पोहचता येईल असे त्या म्हणाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संधी व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी शिर्डी चे उपविभागीय पोलिस अधिकारी .सोमनाथ वाघचौरे साहेब उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्पर्धा परीक्षा हे आव्हान नसून संधी” असल्याचे मत व्यक्त केले तसेच एकूण परिक्षा प्रणाली त्यातील संधी यावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून उपस्थित विद्यार्थ्यांना “तुम्हीही अधिकारी होऊ शकता” असा आत्मविश्वास देत प्रेरित केले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पा.(पाटोदा,औरंगाबाद) तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.श्री . पेरे यांनी ग्रामविकासाचा युवकांचे योगदान या विषयावर बोलताना म्हणाले की,”विचार बदला देश बदलेल आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करा.संतांचे विचार म्हणजेचं अध्यात्माला विज्ञानाची जोड दिली तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून गावाचा विकास कसा करावा ?” याचं सूत्र सांगितलं. युवा प्रबोधन केंद्राबद्दल बोलताना म्हणाले की,हे विद्यार्थी योग्य दिशेने वाटचाल करत आहेत पण यामध्ये अनेक खडतर वाट असून अनेकदा नैराश्य पदरी पडते त्यातूनही तुम्ही मार्ग काढून योग्य वाटचाल करताय याचा आनंद वाटतो. कार्यक्रमाच्या सांगतेला तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत अभय भंडारी( विटा,सांगली) साहेब उपस्थित होते. स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण या विषयावर विचार मंथन करताना “भारतासारख्या सुसंस्कृत भूमीत जन्म होणे हे आपले भाग्य आहे.
परराष्ट्रात जाऊन हिंदू संस्कृतीचे दर्शन करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन मानसिक, शारीरिक, भावनिक,बौद्धिक रित्या सक्षम बना. दृढ आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले तसेच “विवेकानंदांच्या संकल्पनेतील युवक घडवण्याचं काम श्री स्वामी समर्थ युवा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे या लक्ष शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. या व्याख्यानमालेसाठी युवा वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.
फोटो कॅप्शन :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री नितिन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेले लोणी येथील श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवादिनानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय युवा प्रबोधन व्याख्यानमालाचे उदघाटन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील, मार्गदर्शन करताना शिर्डी चे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, समवेत डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे आदी .