लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार पुणे येथे जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते संस्थेच्या विश्वस्त सौ.शालिनीताई विखे यांना प्रदान करण्यात आला. या महाविद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे.
साविञीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या प्रांगणात विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात विविध संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विखे महाविद्यालयाचा पुरस्कार संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह संचालक किशोर नावंदर, सौ.रोहीणी निघुते, सौ.अलका दिघे, प्राचार्य प्रदीप दिघे, प्राचार्य महेश खर्डे, प्रा.दत्तात्रय थोरात, डॉ.रामदास बोरसे, डॉ अनिल वाबळे, प्रा.भाउसाहेब रणपिसे यांनी हा पुरस्कार स्विकारला.प्रदान केला.
१९७१ साली १०२ मुले व ८ मुलींना प्रवेश देऊन लोणीसारख्या खेडेगावात उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण केलेल्या या महाविद्यालयाने आपल्या पाच दशकांच्या कालखंडात परिपूर्ण शैक्षणिक सुविधा आणि वृक्षराजीने नटलेला ५१ एकरांचा विस्तीर्ण परिसर एखाद्या छोटेखानी विद्यापीठास शोभेल असाच निर्माण केला झाला आहे. तीन हजारांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त मुलींची संख्या आणि यापूर्वी तीनदा नॅककडून A ग्रेड मानांकन प्राप्त केलेल्या या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तिस-यादा उत्कृष्ट महविद्यालयास हा पुरस्कार मिळाला आहे असे प्राचार्य डॉ.प्रदिप दिघे यांनी सांगितले.
शेतक-यांच्या, शेतमजुरांच्या मुला–मुलींसाठी उच्च शिक्षणाची सुविधा घराजवळ निर्माण करताना इंग्रजी, विज्ञान व गणित असे विषय घेऊन आपल्या जीवनात स्व:ताच्या पायावर उभे राहिले पाहिजे असा आग्रह धरणारे पद्मश्री विखे पाटील यांनी आर्थिक आडचण हा शिक्षणातील अडसर ठरू नये यासाठी सुरुवातीपासूनच कमवा व शिका योजना सुरू करून आतापर्यंत दहा हजारांच्या वर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली आहे.
कला, विज्ञान व वाणिज्य असे शिक्षण देणा- या महाविद्यालयामध्ये पदवी स्तरावर १९ आणि पदव्युत्तर स्तरावर २१ विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. याशिवाय रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वाणिज्य , अर्थशास्त्र आणि मराठी असे आठ संशोधन केंद्र कार्यरत आहेत. याबरोबरच करियर ओरिएंटेड कोर्सची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच कालसुसंगत अभ्यासक्रम सुरु करून विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील करुन घेण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद आहे.
नैसर्गिक प्रकाशयुक्त वास्तूंचा उत्कृष्ट नमुना असलेली ग्रंथालयाची इमारत आपले लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. महाविद्यालयात प्लेसमेंटचा उपक्रम मोठ्या आस्थेने राबविला जात असून ; आजपर्यन्त हजारो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी त्यातून मिळाल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहाता कामा नये म्हणून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, माजीमंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, सहशिक्षण संचालक नंदकुमार दळे आदींनी अभिनंदन केले आहे.