पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे प्रा. दादासाहेब कोते यांच्या “फुलपाखरू ” या कवितेचा इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’ या पाठयपुस्तकांमध्ये समावेश

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाषा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे  प्रा. दादासाहेब कोते यांच्या “फुलपाखरू ” या   कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही सुलभ भरती मध्ये त्यांची  “झोका “ही कविता  समाविष्ठ असून  प्रा. दादासाहेब कोते यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कवीच्या दुसऱ्या  कवितेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झाल्याने अहमदनगर जिल्ह्यासह  इतर ठिकाणाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.

 विविध साहित्य संमेलनामध्ये वावर असणारे प्रा. दादासाहेब कोते यांचा ‘चांद्रगाणी,फुला-मुलांच्या कविता हे काव्यसंग्रह प्रकाशित असून, “फुलपाखरू ” या  कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश होण्यापूर्वी ‘सुलभ भरती’ मध्ये त्यांची  “झोका “ही कविता  विविध भाषेतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून समाविष्ठ आहे . त्यांच्या ‘पाखरं’या कवितेचा ‘मॉडर्न मराठी पोएट्री खंड -६ मध्ये इंग्रजी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. निवडक किशोर मध्येही त्यांच्या अनेक कविता प्रसिध्द झालेल्या आहेत. तर,”शतकाची बालकविता” या संपादित ग्रंथामध्ये  ‘खेडे ‘ या कवितेचा समावेश आहे.प्रा. दादासाहेब कोते यांचे आकाशवाणीच्या पुणे आणि अहमदनगर केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. तसेच विविध वाड्मयीन दिवाळीअंकामधून त्यांच्या कविता, लेख नेहमीच प्रकाशित होत असतात. विविध वर्तमान पात्रातून त्यांच्या अनेक कविता आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत . 

प्रा. दादासाहेब कोते यांच्या  “फुलपाखरू ” या   कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश झाल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात,  भारत घोगरे, डॉ. अशोक कोल्हे, प्रा. दिगंबर खर्डे ,प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे , डॉ. अण्णासाहेब तांबे , त्यांचे सहकारी प्राद्यापक , चाहते आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.