‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या या राष्ट्रीय संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली असुन, या माध्यमातुन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी व्हीडीओ कॉन्फरंसिंगव्दारे वर्गनिहाय चर्चा तसेच युट्युबव्दारे मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची कार्यवाही, ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकांनी सुरु केली असल्याची माहीती संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.
या संदर्भात माहीती देताना सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, सुट्टीच्या या कालावधीत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात आणि अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ई-लर्निंग सुविधेला प्राधान्य देण्यात आले असुन, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ई-मेल, व्यु-ट्युब,व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि संस्थेच्या वेबसाईटच्या माध्यमातुन पोहचविण्याचा उपक्रम संस्थेने तातडीने सुरु केला आहे. वेळप्रसंगी बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या कम्युनिटी रेडीओचीही मदत यासाठी घेण्यात येणार आहे. संस्थेने शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय तयार करुन दिलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी ई-लर्निंग या संकल्पनेतुन सुरु झाली असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमुद केले.
शासनाच्या आदेशानुसार १४ मार्च २०२० पासुन संस्थेच्या अंतर्गत येणा-या सर्व शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना संस्थेच्या स्कुल बस मधुन त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. फक्त इयत्ता १० आणि १२ वी च्या परिक्षा सुरु आहेत. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ आजारापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे स्पष्ट करुन परिक्षा हॉल तसेच, महाविद्यालयीन परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुंक करण्यासाठी रुग्णालयांच्या नियमानुसार अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक महाविद्यालयांच्या तसेच इतर व्यवसायीक अभ्यासक्रमांच्या परिक्षांबाबत विद्यापीठ व शासनाकडुन येणा-या सुचनांचे पालन करण्यात येणार आहे.
‘कोरोना’ या विषाणुचे संकट ही एक संधी मानुन संस्थेने ई-लर्निंगची सुरु केलेली सुविधा हा एक पथदर्शी प्रकल्प म्हणुन ग्रामीण भागात प्रथमच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरु केला. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी हा उपक्रम नवीन असला तरी भविष्यात याचे असलेले महत्व लक्षात घेवून ही ई-लर्निंग सुविधा घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने वर्क फॉर होम चे समाधान मिळेल असे सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.