लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषि महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कृषी शिक्षणाची आवड असणारे परंतु वंचित राहिलेले, दहावी, बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच शेतीची आवड असणारे तरुण शेतकरी आणि ग्रामीण युवकांना, नोकरी करत असलेले परंतू कृषी शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना कृषि पदविकेनंतरही मराठी भाषेतून कृषि शिक्षणांतून करिअर करता यावे या उद्देशाने संस्थेने हे अभ्यासक्रम सुरू केले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत माळी प्रशिक्षण, कृषि अधिष्ठान, उद्यानविद्या पदविका, कृषि पत्रकारिता, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, फळबागा उत्पादन, भाजीपाला उत्पादन व फुलशेती पदविका इ. कृषिविषयक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून कृषि महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक, तसेच कृषि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिकांसाठी १०० एकर क्षेत्रावरील क्षेञ, प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी कृषि आधारित विविध प्रकल्प, डिजिटल क्लासरुम इ. सुविधा मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याची माहीती संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी सांगितले.
मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत कृषी क्षेत्रात आपले करिअर पुर्ण करण्याची ही संधी असून यासाठीची कृषि शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ३० जून पर्यंत मुक्त विद्यापीठाच्या https://ycmou.ac.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करत असतांना अभ्यास केंद्र संकेतांक क्रमांक ५१२१९ यांवर नोंदणी करावी. प्रवेशासाठी तसेच अधिक माहीतीसाठी प्रा. आर. ए. दसपुते यांच्याशी ८६६८५२६५४९ या संपर्क क्रमांकावरती संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.