केंद्र सरकारची २१ सैनिकी शाळांना मान्यता नगर मधील विखे पाटील शाळेचा समावेश

देशभरात २१ नव्या सैनिकी शाळा सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यात राज्याच्या नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकी शाळा या एकमेव शाळेचा समावेश आहे. या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेशप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२२-२३) या शाळा सुरू होणार आहेत.
केंद्रातर्फे देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, राज्य सरकारांसोबत भागीदारी तत्त्वावर या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत २१ नव्या शाळांना मान्यता देण्यात आली आहे. सध्याच्या सैनिकी शाळा निवासी प्रकारच्या आहेत; परंतु २१ शाळांपैकी सात शाळा दिवसभराच्या असतील, तर १४ शाळा निवासी असतील.  प्रवेश प्रक्रिया सहाव्या इयत्तेपासून सुरू होईल. त्याचे वेळापत्रक www.sainikschool.ncog.gov. in या पोर्टलवर पाहता येईल.
अशी असेल प्रवेशप्रक्रिया
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांसाठी सहाव्या इयत्तेत ४० टक्के जागा असतील. त्याच शाळेत आधी शिकत असलेल्यांसाठी ६० टक्के जागा ठेवल्या जातील. मात्र, त्यांना पात्रता चाचणी द्यावी लागेल. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर शाळेच्या अर्ज प्रक्रियेविषयी माहिती दिली जाईल. जे पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असतील, त्यांना ई-समुपदेशनासाठी www.sainikschool. ncog.gov.in येथे नोंदणी करावी लागेल.—