‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले…

‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना यशाचा दिलेला कानमंत्र सर्वांच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरला. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरा कन्‍या विद्या मंदिर मध्‍ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह पदाधिका-यांनी यांच्‍या समवेत या उपक्रमात सहभाग घेतला.

तणावमुक्‍त परिक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांपासून परिक्षा पे चर्चा उपक्रम सुरु केला आहे. यंदाच्‍या वर्षीही पंतप्रधानांनी देशातील लाखो विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून आनंदमय वातावरणात परिक्षेला सामोरे जाण्‍याचा कानमंत्र दिला. तालुक्‍यातील सर्वच शाळांमध्‍ये हा उपक्रम मोठ्या उत्‍साहाने संपन्‍न झाला.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या ४८ शाखांमधून ११ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हा कार्यक्रम विद्यार्थ्‍यांना पाहाता यावा यासाठी संस्‍थेच्‍या वतीने सुयोग्‍य पध्‍दतीने नियोजन केले गेले होते. प्रवरा कन्‍या विद्या मंदिर येथील कार्यक्रमात महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनीचीही उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिक्षेला सामोरे जाण्‍यासाठी दिलेल्‍या टिप्‍स विद्यार्थी मंत्रमुग्‍धपणे ऐकत होते. आपल्‍या संभाषणातून प्रधानमंत्र्यांनी केलेल्‍या विनोदावर विद्यार्थी दादही देत होते. सहज आणि सोप्‍या भाषेत त्‍यांनी दिलेला यशाचा मंत्र हा सर्वांसाठीच महत्‍वपूर्ण असल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा कोणताही उपक्रम हा लोकाभिमुख होतो, त्‍याचे रुपांतर चळवळीत होते. परिक्षा पे चर्चा या उपक्रमातून विद्यार्थ्‍यांप्रती असलेली त्‍यांची संवेदनशिलता आणि जागृकताच पाहायला मिळत असल्‍याची भावना त्‍यांनी आधोरेखित केली.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील, माजी सभापती बापूसाहेब आहेर, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, नंदकुमार दळे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, राहुल घोगरे, विजय मापारी, पंकज गोर्डे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही शिर्डी येथे कन्‍या विद्या मंदिर या शाळेत परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, साईबाबा संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी राहुल जाधव यांच्‍यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

प्रवरेच्या कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेत नोकरीसाठी निवड…

लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी संलग्ननित महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेमध्ये आर्थिक सल्लागार या पदावरती निवड झाली असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.
कॅम्पस मुलाखतीचे आयोजन लोणी येथील पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात करण्यात आले होते. या कॅम्पस मुलाखतीमध्ये कृषी सलग्ननित महाविद्यालयातील एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.त्यापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १३, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे ९ आणि कृषी महाविद्यालयाचे ६ असे एकूण २८ विद्यार्थ्याची आर्थिक सल्लागार या पदावरती अंतिम निवड झाली आहे. या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे मुख्य प्लेसमेंट अधिकारी प्रा. मनोज परजने, पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी अप्पासाहेब शेळके, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.सुदाम वर्पे आणि प्रा.धीरज कार्ले आदींनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल, मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे , कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे आदींनी अभिनंदन केले आहे.

स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल नवंउद्योगांच्या सोबत…

स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी प्रवरा रिचर्स इनोव्हेशन स्टार्टअप्स आणि सुक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्टार्टअप्स डे निमित्त इनोव्हेटिंग फॉर इंडीया आणि इनोव्हेटिंग फ्रॉम इंडीया अंतर्गत विविध नवं उद्योजकांशी संवाद साधतांना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे तांञिक अधिकारी डॉ. प्रविण कदम, सेन्टींग फ्रिडम टेक्नालॉजी, पुणेयेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी विद्यार्थी राहुल हुडेकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, इनोव्हेशन कॉसिल्सचे अध्यक्ष डॉ. संजय कुरकुटे, समन्वयक डॉ. सुभाष मगर, आयआयटी मुंबई टिगर्स लॅबचे समन्वयक आर. आर भांबारे आदीसह विभाग प्रमुख आणि उद्योजक उपस्थित होते.
देशात आज स्टार्टअप्सची निर्मिती मोठ्या प्रमाण होत आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पानेला बळकटी देतांना नवोद्योगांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या लाखो संधी निर्माण केल्या आहेत. असे ना. विखे पाटील यांनी सांगून ग्रामीण भारत हा लवकरचं उद्योगशील होणार आहे. स्टार्टअप्स च्या माध्यमातून सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी शासकीय विविध योजना, विद्यापीठ संशोधन, विविध कंपन्याचे तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून मद्दत ही होत असल्याने राज्यासह ग्रामीण भागात ही नवोद्योगांची संख्या वाढत आहे. असे सांगून प्रवरेच्या या केंद्राचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी डॉ. प्रविण कदम आणि राहुल हुंडेकरी यांनी थेट संवादातून विविध अडचणी आणि यावर उपायोजना सुचविल्या. प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी प्रवरा अभियांत्रिकीच्या माध्यमातून सर्वाना नवीन स्टार्टअप्स साठी मार्गदर्शन केले जात आहे. विविध सुविधा त्याना उपलब्ध असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकांत डॉ. संजय कुरकुटे यांनी प्रवरेच्या इनोव्हेशन संशोधन केंद्राचा आढावा घेत सप्टेंबर 2022 पासून ६३ स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे यामध्ये ग्रामीण युवक, प्राध्यापक, उद्योजक यांचा सहभाग महत्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवीन शिक्षण पद्धती नुसार अभियांत्रिकाची वाटचाल सुरू झाली आहे. यावेळी स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या उद्योजकांचा गौरव ना. विखे पाटील यांनी केला.

प्रजासत्ताक संचलनासाठी प्रवरेच्या वैष्णवी मापारी यांची निवड..

गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाची तृतिय वर्ष बीसीए विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी वसंत मापारी हिची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमुमध्ये निवड झाली आहे ती १७ जानेवारीपासून सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली.
तिच्या या निवडीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली नवले उपप्राचार्य प्रा . राजश्री तांबे, विभाग प्रमुख प्रा संजय वाणी , डॉ कांचन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या निवडी बद्दल महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

प्रवरेच्या डाॅ.महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट..

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्रेरणा धनंजय जाधव यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. आपल्या संशोधनामध्ये प्रेरणा जाधव यांनी “रुटा ग्रेव्होलेन्स एल” या वनस्पतीच्या माध्यमातून हर्बल औषधांची निर्मिती करत असताना या औषधांचा विविध उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीचे संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगाने डॉ. महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांनी पुढे आणखी सखोल व नाविन्यपूर्ण संशोधन करत हर्बल औषधांची निर्मिती व विकास कसा होत जाईल व त्याचा मानवी जीवनासाठी व आरोग्यासाठी कसा उपयोग होईल यासंदर्भात संशोधन केले
या संशोधनावर आधारित पेटंट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नुकतेच पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. नाविन्यपूर्ण संशोधन करून पेटंट मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
त्यांच्या या संशोधकीय कार्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव डॉ. शिवानंद हिरेमठ व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना पोलीस आणि सैन्‍य भरती प्रक्रीयेसाठी असलेले शारिरीक आणि बौध्‍दीक प्रशिक्षण स्‍थानिक पातळीवरच उपलब्‍घ करुन देण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने १४ प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात…

राज्‍यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु झाल्‍यानंतर ग्रामीण भागातील असंख्‍य तरुण तरुणी या भरती प्रक्रीयेसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्राकडे आकर्षित होवून तिथे आपला प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्‍यांना राहाण्‍याची सुविधा उपलब होत नाही. आशा पार्श्‍वभूमीवर निर्माण होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण केंद्राची उभारणी करुन, पोलीस, सैन्‍य भरती प्रक्रीयेतील इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना संधी उपलब्‍ध करुन दिली आहे.
मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून संस्‍थेची महाविद्यालये असलेल्‍या १४ गावांमध्‍ये ही प्रशिक्षण केंद्र सुरु झाली आहेत. केंद्रामध्‍ये दाखल झालेल्‍या विद्यार्थी, विद्यार्थींनींना रोज सकाळी आणि संध्‍याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत मैदानावर शारिरीक प्रशिक्षण दि‍ले जाते. या मध्‍ये प्रामुख्‍याने धावणे, गोळाफेक, लांब उडी, सुर्य नमस्‍कार, योगासने अशा क्रिडा प्रकारांचा समावेश असून यासाठी संस्‍थेतील क्रीडा शिक्षक विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. बाहेरील मार्गदर्शकांनाही यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले असून, त्‍यांचेही मार्गदर्शन या विद्यार्थ्‍यांना उपयुक्‍त आणि महत्‍वपूर्ण ठरत आहे.

प्रशिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या वतीने दररोज केळी, अंडी आदि दूध यांचा नाष्‍टा सकाळी मोफत स्‍वरुपात देण्‍यात येतो. दुपारच्‍या वेळी या विद्यार्थ्‍यांना बौध्दिक आणि स्‍पर्धा परिक्षांसाठी उपयुक्‍त असलेले शैक्षणिक मार्गदर्शनाची सुविधाही महाविद्यालयांमधून निर्माण केली आहे. केवळ पोलीस आणि सैन्‍य भरती नाही तर शासनाच्‍या सरळ सेवा भरती प्रक्रीयेत आवश्‍यक असलेल्‍या सर्वच स्‍पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्‍यात येत आहे. डिसेंबर २०२२ पासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने हा उपक्रम सुरु केलेला उपक्रम भविष्‍यातही कायमस्‍वरुपी सुरु ठेवण्‍याचा मानस मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक पातळीवरच हे प्रशिक्षण मोफत उपलब्‍ध झाल्‍याने याचा मोठा दिलासा विद्यार्थी, विद्यार्थींनींना मिळाला असून, आत्‍तापर्यंत ६१९ विद्यार्थी या केंद्रामध्‍ये दाखल झाले आहेत.