‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले…

‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना यशाचा दिलेला कानमंत्र सर्वांच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरला. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरा कन्‍या विद्या मंदिर मध्‍ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह पदाधिका-यांनी यांच्‍या समवेत या उपक्रमात सहभाग घेतला.

तणावमुक्‍त परिक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांपासून परिक्षा पे चर्चा उपक्रम सुरु केला आहे. यंदाच्‍या वर्षीही पंतप्रधानांनी देशातील लाखो विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून आनंदमय वातावरणात परिक्षेला सामोरे जाण्‍याचा कानमंत्र दिला. तालुक्‍यातील सर्वच शाळांमध्‍ये हा उपक्रम मोठ्या उत्‍साहाने संपन्‍न झाला.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या ४८ शाखांमधून ११ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हा कार्यक्रम विद्यार्थ्‍यांना पाहाता यावा यासाठी संस्‍थेच्‍या वतीने सुयोग्‍य पध्‍दतीने नियोजन केले गेले होते. प्रवरा कन्‍या विद्या मंदिर येथील कार्यक्रमात महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनीचीही उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिक्षेला सामोरे जाण्‍यासाठी दिलेल्‍या टिप्‍स विद्यार्थी मंत्रमुग्‍धपणे ऐकत होते. आपल्‍या संभाषणातून प्रधानमंत्र्यांनी केलेल्‍या विनोदावर विद्यार्थी दादही देत होते. सहज आणि सोप्‍या भाषेत त्‍यांनी दिलेला यशाचा मंत्र हा सर्वांसाठीच महत्‍वपूर्ण असल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा कोणताही उपक्रम हा लोकाभिमुख होतो, त्‍याचे रुपांतर चळवळीत होते. परिक्षा पे चर्चा या उपक्रमातून विद्यार्थ्‍यांप्रती असलेली त्‍यांची संवेदनशिलता आणि जागृकताच पाहायला मिळत असल्‍याची भावना त्‍यांनी आधोरेखित केली.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील, माजी सभापती बापूसाहेब आहेर, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, नंदकुमार दळे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, राहुल घोगरे, विजय मापारी, पंकज गोर्डे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही शिर्डी येथे कन्‍या विद्या मंदिर या शाळेत परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, साईबाबा संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी राहुल जाधव यांच्‍यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.