महात्मा ज्योतिराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत आणि एक क्रांतिकारी समाजसुधारक होते. – भारत घोगरे.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून तत्कालीन सामाजिक परिस्थिती मध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्वप्रथम ‘विद्येविना मती गेली’ या महाराष्ट्रात खळबळ ओळींद्वारे समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठची मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच ज्योतिराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत आणि एक क्रांतिकारी समाजसुधारक होते असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भारत घोगरे यांनी केले.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या थोर महापुरूषाला लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रवरा परिवाराकडून विनम्र अभिवादन करताना श्री भारत घोगरे बोलत होते. या प्रसंगी शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, डॉ.प्रिया राव,एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेफाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये एक शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.असे ते म्हणाले.