योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली

आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताने आयुष्यातील आनंदही अनुभवावा,असे प्रतिपादन लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत भाग्येश जावळे बोलत होते. श्री जावळे हे सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसाद कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विदयार्थीशी बोलताने भाग्येश जावळे म्हणाले की, कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्याक्रमाचे प्रस्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे यांनी केले, सुत्रसंचालन सौरभ केदार यांनी केले तर महाविदयालयाच्या माजी विदयार्थी समन्वयक प्रा. सारिका पुलाटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक व शिक्षक्केतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी आणि सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत असलेले भाग्येश जावळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असतांना स्टाफ बरोबर .